logo

विटा शहरातील यंत्रमाग व्यवसाय

यंत्रमाग व्यवसाय

विटा शहरास जवळपास गेल्या शंभर वर्षांची वस्त्रोद्योगाची परंपरा असून, डबरी माग, हातमाग, यंत्रमाग, सेमी ऑटोमॅटिक व ऑटोमॅटिक यंत्रमाग तसेच आता अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरलेल्या शटरलेस लूम्स (धोटाविरहित), रेडिमेड गारमेंट्स, निटिंग गारमेंट्स, अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित खाजगी तत्त्वावरची सूतगिरणी, असा या व्यवसायाचा आतापर्यंतचा इतिहास आहे. डबरी मागापासून ते आजच्या स्वयंचलित यंत्रमागापर्यंतचा संघर्षमय प्रवास या ठिकाणच्या यंत्रमाग व्यावसायिकांची जिद्द, कष्ट व व्यवसायावरची अढळ श्रद्धा या जोरावर टिकून आहे.

विटा शहरात खूप वर्षापासून वास्तव्यास असणारे कोष्टी समाजाचे लोक त्यांचा पारंपारिक विणकामाचा व्यवसाय करीत होते. 1900 ते 1950 पर्यंतच्या काळात डबरी मागावर लुगडीचे (ग्रामीण साडी) उत्पादन घेतले जात होते. हा खड्डा किंवा डबरी माग पूर्णपणे लाकडापासून बनविलेला असायचा आणि त्याचा अर्धा भाग जमिनीखाली खड्ड्यामध्ये बसवलेला असायचा, म्हणून त्यास डबरी किंवा खड्डाक म्हटले जायचे. त्यानंतर डबरी मागाची सुधारित आवृत्ती म्हणून हातमाग आले. त्यावरदेखील लुगडी व रंगीत साड्या तयार केल्या जात होत्या. या रंगीत साड्या थेट ग्राहकाने वापरण्यायोग्य होत्या.

1959 मध्ये शहरात काळूआण्णा म्हेत्रे, विठोबा रोकडे, विष्णुपंत तारळेकर व इतर काही लोकांनी एकत्र येऊन विजेवर चालणारा पहिला यंत्रमाग आणला. परंतु या यंत्रमागासाठी आवश्यक वीज उपलब्ध नसल्याने पहिले काही दिवस हा यंत्रमाग डिझेल इंजिनवर चालवला. त्यानंतर शहरातील यंत्रमाग उद्योजक व इतर काही प्रतिष्ठित लोकांनी एकत्र येऊन विटा इलेक्ट्रिक सप्लाय को-ऑपरेटिव्ह सोसायटी अर्थात पॉवर हाउस स्थापना करून विजेची उपलब्धता करून दिली. हा शहरातील यंत्रमाग उद्योगातील मौलाचा दगड ठरला.

यंत्रमागासमोर येणाऱ्या विविध अडचणी सोडवण्यासाठी शहरातील यंत्रमाग धारकांनी एकत्र येऊन अनंतराव म्हेत्रे यांच्या अध्यक्षतेखाली यंत्रमागधारकांची प्रातिनिधिक संस्था म्हणून “विटा यंत्रमाग औद्योगिक सहकारी संघ मर्यादित, विटा” नावाच्या संघटनेची स्थापना केली. विटा शहरातील यंत्रमाग व्यवसायाचे आधुनिकीकरण व्हावे आणि या ठिकाणचा व्यवसाय जागतिक स्पर्धेसाठी तयार व्हावा यासाठी शहरातील यंत्रमाग व्यवसायिकांनी एकत्र येऊन “न्यू इंडिया टेक्स्टाईल पार्क” च्या माध्यमातून विटा-सांगली रोडवर एम.आय.डी.सी. मध्ये प्रकल्प उभा केला. त्या ठिकाणी प्रत्यक्ष कापड उत्पादन 2008 मध्ये सुरू झाले. अशा रीतीने विटा शहरातील यंत्रमाग व्यवसायाचा खड्डा मागापासून ते स्वयंचलित यंत्रमागापर्यंतचा गेल्या शंभर वर्षातील प्रवास निश्चितच सुखाचा नव्हता. या ठिकाणच्या यंत्रमाग व्यवसायिकांनी जिद्द आणि कष्टाच्या बळावर हा व्यवसाय टिकवून धरला आहे आणि वाढविला सुद्धा आहे.