logo

विटा शहराचा पाणीपुरवठा

शहराचा पाणीपुरवठा

विटा शहर 3 लहान ओढ्यांच्या संगमावर वसलेले आहे. शहरात कोणतीही नदी नाही. त्यामुळे विट्यात पाण्याची दुरावस्था असे. 1917 मध्ये विटा नगरपालिकेने पिण्याचे पाण्यासाठी विहीर खोदली. त्याला आठ हजार रुपये खर्च झाले म्हणून त्या विहिरीला आठ हजार विहीर असे नाव पडले. 1927 मध्ये विटा परिसरात पाणी समस्या गंभीर झाली होती. तत्कालीन मुंबई सरकारने खास विलायतेवरून आलेला पागसन नावाचा जलसंशोधक विटा येथे सर्वे साठी पाठविला. पागसन यांनी विटा येथे आल्यावर आपल्याकडील यंत्र घेऊन रानोमाळ सर्वे केला.

गावाला पुरेसा होईल असा पाण्याचा साठा हवा होता. शेवटी असा साठा धनगर ओढ्याच्या उगमापाशी दिसून आला. हे ठिकाण गावापासून सुमारे सव्वा मैल अंतरावर आहे. मूळ पाण्याचे ठिकाण फारसे मोठे नाही. सर्वसामान्य लोक तर त्याला पाण्याचा खड्डा म्हणतात. हा खड्डा भूगर्भातील निसर्गनिर्मित पाण्याने सतत भरलेला असतो. तो लहान विहिरीसारखा बांधून घेऊन तलावाच्या पाठाप्रमाणे त्यात नळ घालून पाणी स्वाभाविक उताराने घेऊन गावातील बांधलेल्या दगडी टाकीत पडू शकते. या कामी यांत्रिक साधन लागत नाही. पाणी सोडणे आणि बंद करणे, हेच काम असल्याने पाणी बिनखर्चानेच मिळेल, असा अहवाल पागसन यांनी सरकारकडे दिला.



सरकारने कामाचा अंदाजपत्रक तयार केले. या योजनेमध्ये धनगर ओढ्यामध्ये लहान तीन-चार बांधीव विहिरी तयार केल्या असून, त्या लोखंडी पाईपने जोडल्या आहेत. पुढे पाईपलाने गांधी चौकातील दगडी पाण्याच्या टाकीपर्यंत पाणी आणले आहे. गावातील टाकीपासून रस्तोरस्ती आणि गल्लोगल्ली पाणी गावभर खेळविले. खासगीही चाव्या दिल्या. ग्रामस्थ व पुढाऱ्यांचे चिकाटीचे प्रयत्न, पागासन यांचे कौशल्य आणि सरकारची आर्थिक मदत यामुळे विट्याच्या पाण्याची एक निरंतरची अडचण दूर झाली.

सध्या विटा शहरापासून ३२ किमी दूर असलेल्या कृष्णा नदीच्या पात्रातील घोगाव या गावातून पाणी आळसंद येथील जलशुद्धीकरण केंद्र येथे आणले जाते. त्या ठिकाणी पाण्याचे शुद्धीकरण होऊन शुद्ध पाणी सर्व विटेकरांना पुरविले जाते.