विटा आणि खानापूर परिसरात टप्प्याटप्प्याने वैद्यकीय सेवा विकसित होत गेली. सुरुवात ब्रिटिश राजवटीत झाली. नंतर नगरपालिकेच्या सहाय्याने वैद्यकीय सुविधा सुरू झाल्या. शासकीय आरोग्य सेवा लोकल बोर्ड व नंतर जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित झाले. हळूहळू खाजगी वैद्यकीय सेवा विकसित होत गेल्या. अत्याधुनिक सुविधा व अतिदक्षता विभाग सुरू झाले आणि विटा हे वैद्यकीय केंद्र बनले.
ब्रिटिश सरकारकडून 25 मार्च 1861 रोजी विटा येथे धर्मार्थ दवाखाना काढल्याबद्दल प्रथम जाहीरनाम निघाला होता. तथापि नगरपालिकेत स्वमालकीचा दवाखाना काढता आला नव्हता. अमेरिकन मिशन तर्फे विटा येथे चालू असलेल्या मिशनच्या दवाखान्यास व मालवणकर यांच्या आयुर्वेदिक रुग्णोपचार येथेच नगरपालिका अनुदान देऊन नागरिकांची सोय करत असे. तथापि, 1958 मध्ये नगरपालिकेने स्वत:चा दवाखाना उघडला.
या दवाखान्याचे उद्घाटन दक्षिण साताराचे जिल्हाधिकारी आर. जी. शिंदे यांच्या हस्ते 17 जुलै 1958 रोजी करण्यात आले. त्यावेळी दवाखाना नगरपालिकेच्या मालकिच्या घर नं 20 या इमारतीत सुरू होता. या ठिकाणी नागरिकांना मोफत औषधोपचार केले जात होते. साधारण 1985 च्या दरम्यान विटा येथे ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यात आले.