logo

विटा शहराची ऐतिहासिक पार्श्वभूमी

ऐतिहासिक पार्श्वभूमी

विटा खानापूर तालुक्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. इथले ऐतिहासिक संदर्भ थेट रामायण काळापर्यंत पोहोचतात. तालुक्यात आढळणाऱ्या विविध शिलालेखात खानापूर तालुक्याचा उल्लेख आहे. तालुक्यातील विविध मंदिरांमध्ये प्राचीन संदर्भात यादव काळ आणि मुस्लिम राजवटीच्या पाऊलखाना येथे आढळतात. खानापूर येथील प्रवेशद्वार बुरुज आणि दर्गा याची साक्ष देतात. ऐहोले शिलालेखात विटे खानापूर भागात संदर्भ आढळतो. या शिलालेखात महाराष्ट्राचे तीन भाग दिलेले आहेत. त्यात कुंतल देश असून हा देश म्हणजे कृष्णा नदीच्या परिसरातील भाग होय. कृष्णेच्या खोऱ्यात विटा खानापूर हा प्रदेश येतो. यावरून आपल्या भागाची वसाहत रामचंद्राच्या काळात होती हे सिद्ध होते.

रामकाळात या भागाला अंबिका प्रांत असे नामाभिदान असल्याचे दिसून येते. इ.स. 300 पर्यंतच्या काळात विटा भागात सातवाहन यांचे राज्य होते. सातवाहनानंतर राष्ट्रकूट घराणे आले. या घराण्याने इ.स. 300 ते 600 व पुन्हा इ.स. 750 ते 973 च्या काळात महाराष्ट्रात राज्य केले. राष्ट्रकूटानंतर चालुक्यांनी इ.स. 600 ते 753 व 973 ते 1189 पर्यंत विटा भागावर राज्य केले.

चालुक्यानंतर विटा खानापूरचा प्रदेश हा कलचुरी राज्यात होता. कलचुरीनंतर विटा खानापूर भागावर शिलाहारांचा अंमल सुरू झाला. या शिलाहार घराण्याची सत्ता इसवी सनाच्या 12 व्या शतकात विटा भागावर होती. पण ती नष्ट होऊन देवगिरीच्या यादव घराण्याकडे गेली.

यादवांच्या नंतर महाराष्ट्रावर मुसलमानी अंमल सुरू झाला. इ. स. १३४७ मध्ये दक्षिणेत बहामणी राज्य स्थापन झाल्यावर आणि पुढे त्याचेही तुकडे पडल्यावर कधी अहमदनगरचे निजामशाहीची, तर कधी विजापूरच्या आदिलशाहीची सत्ता महाराष्ट्रातील निरनिराळ्या भागात होती. विटा खानापूर भागात आदिलशाही सत्ता मराठी स्वराज्याचे स्थापनेपर्यंत होती. विट्यातही गावाबाहेर आग्नेय दिशेस आजही त्याकाळचा एक घुमट आहे व त्या परिसरास गावातील लोक घुमटमाळ संबोधतात. मराठी राज्यात प्रधान मंडळाच्या वतीने राज्याचा कारभार चालू झाला.

घुमटमाळ येथील घुमट

छत्रपती राजारामांच्या काळात राजाचा प्रतिनिधी म्हणून कारभार पाहण्याकरिता प्रतिनिधीपद निर्माण करावे लागले. हे प्रतिनिधी पद परशुराम त्र्यंबक यांना देण्यात आले. म्हणजे परशुराम त्र्यंबक हे मराठी राज्याचे पहिले प्रतिनिधी होत.शाहू महाराज औरंगजेबाच्या ताब्यातून इ.स. 1708 मध्ये सुटून आल्यानंतर त्यांनी हे प्रतिनिधी पद परशुराम त्र्यंबक यांना दिले. महाराणी ताराबाई यांनी कोल्हापूर प्रांतात राजारामवंशीय गादी निर्माण केली आणि सातारा गादीचे प्रतिनिधी परशुराम त्र्यंबक यांचे चिरंजीव कृष्णाजी परशुराम यांना पन्हाळा (कोल्हापूर) गादीचे प्रतिनिधी नेमले. म्हणजे वडील साताराच्या गादीचा, तर मुलगा कोल्हापूर (पन्हाळ्याच्या) गादीचा प्रतिनिधी होता. त्यांची नावे विटेकर प्रतिनिधी म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे.

त्र्यंबक कृष्ण यांनी विटा येथे स्वतः करिता भव्य वाढा बांधला. तटबुरूच असलेल्या ऐतिहासिक वैभवची साक्ष देणारा हा जुना वाडा त्र्यंबकराव यांनी बांधला होता. त्याला चार बुरुज होते. 1848 मध्ये इंग्रजांनी सातारचे राज्य म्हणजेच मराठ्यांचे राज्य खालसा केले आणि इंग्रजांचे राज्य सुरू झाले. अशा रीतीने 1848 मध्ये वाडा रितसर इंग्रजांच्या ताब्यात गेला. सातारा जिल्ह्यातील सर्व रजिस्टर कचेऱ्यातील निरंतरचे जुने रेकॉर्ड संरक्षणासाठी या वाड्यात ठेवण्यात आले. जुन्या नगरपालिकेची इमारत एक बुरुज पाडून बांधली. दुसरा बुरुज पाडून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारला. तिसरा बुरुज पाडून अण्णाभाऊ साठे स्मारक उभारणीचे काम चालू आहे. चौथ्या बुरुजाचे अवशेष विनोद कॅफे हॉटेलच्या मागे आहेत.