हणमंतराव पाटील यांचा जन्म विटा येथील सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे इयत्ता सातवी पर्यंतचे शिक्षण विट्याच्या सेन्ट्रल स्कूलमध्ये झाले. 1944 मध्ये त्यांनी विटा नगरपालिकेमध्ये नाका कारकूणाची नोकरी पत्करली. त्यानंतर त्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन स्वतःला समाजकार्यात झोकून दिले. पुढे 1956 मध्ये ते विटा नगरपालिकेचे निवडणुकीत निवडून येऊन उपनगराध्यक्ष बनले. नंतर 1974 मध्ये त्यांची थेट नगराध्यक्ष म्हणून निवड झाली.
पुढे १९८५ मध्ये त्यांची पुन्हा नगराध्यक्ष म्हणून निवड झाली. अशा रीतीने त्यांनी साधारण 17 वर्षापेक्षा जास्त काळ या पदावर काम केले.1980 मध्ये समाजवादी काँग्रेस पार्टी कडून खानापूर - आटपाडी मतदारसंघातून ते विधानसभा निवडून आले.
हणमंतराव पाटील यांनी आपल्या कारकिर्दीत विटा शहराच्या मध्यभागी नगर परिषदेची भव्य इमारत, ग्रामीण रुग्णालयाची स्थापना, मुख्य चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, यशवंतराव चव्हाण आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांचा पूर्णाकृती पुतळा, नगरपरिषदेच्या सहाय्याने प्राथमिक शाळेच्या आर.सी.सी. इमारती बांधून दिल्या, जनता सहकारी बँकेची स्थापना अशी विविध कामे केली. अशा प्रकारे सुमारे 30 वर्षे विटा शहराचे नेतृत्व करून त्यांनी या शहराचा कायापालट केला. विटा शहर हे एक सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय व व्यापारी दृष्ट्या महत्त्वाचे केंद्र म्हणून विकसित करण्याचे श्रेय निश्चितपणे हणमंतराव पाटील यांना जाते.