logo

विटा शहराची शैक्षणिक पार्श्वभूमी

शैक्षणिक पार्श्वभूमी

इंग्रजी राजवटी बरोबरच शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. विटा येथे प्राथमिक शिक्षणाची सुरुवात 01 ऑक्टोबर 1854 पासून पहिली शाळा सुरू करून करण्यात आली. इंग्रज सरकारने स्वतः सेंट्रल स्कूलची इमारत बांधली. आणि ती 24 सप्टेंबर 1885 रोजी नगर परिषदेच्या ताब्यात दिली. जिल्हा लोकल बोर्ड आणि नंतर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण शिक्षणाचा पाया मजबूत झाला. 1937 मध्ये सांगली शिक्षण संस्थेने विट्यात हायस्कूल सुरू केले. 1948 मध्ये रयत शिक्षण संस्थेने खानापूर मध्ये हायस्कूल सुरू केले, तर 1962 मध्ये बळवंत महाविद्यालयाच्या माध्यमातून विट्यात उच्च शिक्षणाचे दालन सुरू झाले.

1913 मध्ये मुलींसाठी स्वतंत्र शाळा सुरू करण्यात आली. कालांतराने त्या शाळेला कन्या शाळा क्रमांक 3 असे नाव देण्यात आले. शाळा नंबर 1 मध्ये मुलांच्या संख्येत चांगली वाढ झाल्यामुळे शाळा नंबर २ अशी स्वतंत्र शाळा १९४४ पासून सुरु करण्यात आली. विटा शाळा नंबर ४ ही 01 ऑगस्ट 1943 रोजी हरिजनांच्या मुलांकरीता हरिजन वस्तीत सुरू करण्यात आली. मुस्लिम समाजाला मातृभाषेतून शिक्षण मिळवण्यासाठी 1930 मध्ये उर्दू शाळा स्थापन करण्यात आली. आजरोजी नगरपरिषदेच्या एकूण 19 शाळा सुरु आहेत.