logo

विटा येथील कुक्कुटपालन व्यवसाय

कुक्कुटपालन व्यवसाय

खड्डामाग, हातमाग, यंत्रमाग आणि स्वयंचलित यंत्रमाग अशी व्यवसायाची स्थित्यंतरे असताना अनेक वेळा यंत्रमाग व्यवसायावर संकटे आली. विटा शहर व परिसराचे अर्थकारण गतिमान करणाऱ्या या व्यवसायाला आणखी एक पर्याय असावा म्हणून तरुण उद्योजकांनी कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करून इतरांनाही प्रोत्साहन देण्याचे काम केले. अनेक लघु उद्योजकांनी पर्यायी उद्योग म्हणून कुक्कुटपालन व्यवसायात पदार्पण केले. या व्यवसायात ही विट्याची राज्यस्तरावर ओळख निर्माण झाली.

खानापूर तालुक्याच्या ग्रामीण भागातील शेतकरी देशी कोंबड्या पाळत असे. त्यातून मिळणाऱ्या अंडी तसेच कोंबड्या विटा खानापूर येथील बाजारात विक्री करत असत. विटा येथे बाबूमियाँ तांबोळी हे लहान व्यापाऱ्यांकडून अंडी खरेदी करून मुंबई येथे विक्रीसाठी पाठवीत. अशा पद्धतीने विट्यातील परंपरागत अंडी, कोंबडी खरेदी विक्रीचा व्यवसाय खानापूर तालुक्यात सुरू होता.

साधारण 1978 मध्ये विटा येथे पोल्ट्री व्यवसायाची सुरुवात झाली. सुरुवातीला विनोद गुळवणी, मधुकर चराटे, जगदीश सगरे यांनी पंचशील पोल्ट्री या नावाने कराड मार्गावर पोल्ट्री सुरू केली. त्यानंतर विटा मर्चेंट बँकेचे तत्कालीन चेअरमन भाऊसाहेब भंडारे यांनी पोल्ट्री व्यवसायासाठी कर्ज पुरवठा करण्याचे धोरण सुरू केले. त्यानंतर हळूहळू पोल्ट्री व्यवसाय वाढू लागला. व्यवसायाची व्याप्ती वाढत असताना सन 2000 पर्यंत शहरातील अनेक तरुणांनी या व्यवसायात पदार्पण केले आणि बघता बघता विटा शहर व तालुका राज्यातील कुक्कुटपालन केंद्र म्हणून उदयास आला. अशा रीतीने विटा खानापूर परिसरात शंभर पक्षापासून सुरू झालेला हा व्यवसाय बावीस लाख पक्षांपर्यंत विस्तारला. अशा रीतीने पोल्ट्री व्यवसाय हा खानापूर तालुक्याच्या अर्थकारणाचा एक महत्त्वाचा आणि अविभाज्य घटक झालेला आहे.