logo

विटा शहराविषयी माहिती

शहराविषयी

महाराष्ट्र राज्याच्या सांगली जिल्ह्यांतील खानापूर तालुक्यातील विटा हे प्रमुख शहर आहे. सदर शहराची लोकसंख्या ४८,२८९ इतकी आहे . विटा शहर हे सांगली जिल्हा मुख्यालयापासून ५५ किमी उत्तरेस आहे. सातारा शहराच्या आग्नेयेस सुमारे ७५ किमी अंतरावर आहे. ऐतिहासिकदृष्ट्या या नगराला महत्त्व आहे. छत्रपतींच्या प्रतिनिधीचे वास्तव्य येथे होते. त्र्यंबक कृष्ण यांनी एक वाडा येथे बांधला. विट्याला येण्यापूर्वी ते पन्हाळगडच्या प्रतिनिधींचे कारभारी होते. सध्या या वाड्याचे केवळ भग्नावशेष आढळतात. त्र्यंबक कृष्ण यांनीच येथील त्रिंबकेश्वर मंदिर बांधले असे सांगतात.

विटा हे तालुक्यातील प्रमुख वाणिज्य व व्यापारी केंद्र आहे. सोमवार व गुरुवार असा दोनदा बाजार भरतो. ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा, उडीद,तूर, भुईमुग शेंग, मिरची, हळद यांचा व्यापार येथे चालतो. येथील गुरांचा बाजारही मोठा असतो. नगरात पूर्वीपासून विणकाम व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालत आहे. पूर्वी नगराभोवती ६.०९ मी. उंचीची दगड व मातीतील भिंती होती व तिला पूर्वेच्या व पश्चिमेच्या बाजूला दरवाजे होते. १८५४ मध्ये येथे नगरपालिकेची स्थापना करण्यात आली. महाविद्यालयीन शिक्षणापर्यंतच्या सोयी येथे आहेत. भैरवनाथ (ग्रामदैवत), विठोबा, मारुती,गणपती, दत्तात्रय, त्रिंबकेश्वर यांची मंदिरे नगरात आहेत.

सोन्याचे शहर

इतिहास, कला आणि संस्कृतीनेसमृद्ध विटा शहराला "सोन्याचे शहर" असे टोपणनाव पडले आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री श्री. यशवंतरावजी चव्हाण यांचे प्राथमिक शिक्षण येथेच झाले. विटा हे सण उत्सवासाठी प्रसिद्ध आहे. सर्वात मोठा आणि सर्वोत्तम म्हणजे दसरा, ज्यामध्ये रेवणसिद्ध आणि भैरवनाथाच्या पालखी एकमेकांशी स्पर्धा करतात.

रेवणसिद्ध देवाला विट्याचे पाहुणे मानले जाते म्हणून त्यांच्या पालखीला विटा भैरवनाथाच्या पालखीच्या 100 मीटर पुढे शर्यत सुरू करण्याचा लाभ दिला जातो. हा कार्यक्रम पाहण्यासाठी राज्यभरातून लोक येतात. विटा हे भैरवनाथ यात्रेसाठीही प्रसिद्ध आहे. विट्यापासून 8 किमी अंतरावर असलेले भगवान रेवणसिद्ध मंदिर हे सांगली जिल्ह्यातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे. हे मंदिर अध्यात्माचे प्रतीक आहे. विट्यापासून या मंदिरापर्यंतचा प्रवास वळणांनी भरलेला आहे.