logo

विटा नगरपालिका स्थापना पार्श्वभूमी

History Image

नगरपालिका स्थापना

सातारा 1848 मध्ये ब्रिटिशांच्या राजवटीखाली आला. इंग्लंडच्या धरतीवर भारतात नगरपालिका स्थापन करण्यासाठी नगरपालिकांचा 1850 चा अॅक्ट 26 मंजूर करण्यात आला. त्यानुसार सातारा जिल्ह्यात आष्टा, इस्लामपूर, कराड, माल्कमपेठ (महाबळेश्वर), मायणी, म्हसवड, पुसेसावळी, रहिमतपूर, सातारा, शिंगणापूर, तासगाव, विटा आणि वाई अशा एकूण १३ नगरपालिका 1853 ते 1855 दरम्यान स्थापन करण्यात आल्या. सुरुवातीच्या काळात जिल्ह्याचा कलेक्टर हा नगरपालिकेचा अध्यक्ष तर संबंधित उपविभागाचा डेप्युटी कलेक्टर हा उपाध्यक्ष असे.

विटा नगरपालिकेच्या इतिहासाचा मागावा घेत असताना नगरपालिकेची हद्द 1876-1877 च्या रेकॉर्डमध्ये खालील प्रमाणे नमूद केलेली दिसून येते.
उत्तरेस : गार्डी व भांबर्डे
दक्षिणेस : कार्वे, खंबाळे व भाळवणी
पूर्वेस : रेणावी, कुर्ली व वासुंबे
पश्चिमेस : कळंबी, ढवळेश्वर व नेवरी
यावेळी विट्याची ची लोकसंख्या 4200 इतकी नमूद आहे व गावात 723 घरे होती.

1885 मध्ये विटा नगरपालिकेची पहिली निवडणूक झाली. त्यानंतर दर तीन वर्षांनी अशीच निवडणूक होत राहिली. एकंदर बारापैकी निम्मे (सहा) सभासद लोकनियुक्त होते. तर प्रेसिडेंट कलेक्टरच होते. 1917 मध्ये नगरपालिकेच्या प्रेसिडेंट निवडणुकीच्या बाबतीत महत्त्वाचा बदल झाला.

त्यानुसार 1923 मध्ये झालेल्या निवडणुकीत विष्णू विठ्ठल इनामदार हे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडले गेले. नंतरच्या काळात विट्याच्या विकासात व जडणघडणीत विठ्ठलराव दादासाहेब पाटील, हणमंतराव यशवंतराव पाटील, सदाशिवराव पाटील यांनी मोलाचे योगदान दिले. स्वच्छतेबरोबरच विकासाच्या विविध मापदंडामध्ये विटा शहराने खास ओळख निर्माण केली आहे.