logo

विटा नगरवाचनालयाचा इतिहास

नगरवाचनालयाचा 150 वर्षांचा इतिहास

विटानगर पालिकेची स्थापना 30 मार्च १८५४ रोजी झाली. याच नगरपालिकेमार्फत 01 आक्टोंबर 1854 पासून सेंट्रल स्कूल विटा म्हणजेच सध्याचे नगरपालिका शाळा क्रमांक 1 सुरू झाली. या शाळेनंतरची 1869 मध्ये विटा येथील सर्वात जुनी व लोकोपयोगी संस्था म्हणून उदयास आलेली नगरवाचनालय ही एकमेव संस्था आहे.

1848 मध्ये सातारा जिल्ह्यात ब्रिटिश राजवट लागू झाली. ब्रिटनमध्ये नगरपालिका, वाचनालय या संकल्पना अस्तित्वात होत्या. नुकतीच विट्यामध्ये नगरपालिकेची स्थापना झाली होती. तत्कालीन नगरपालिका सर्वस्वी सरकारच्या नियंत्रणाखाली होती.

14 जून १८६९ रोजी विटा नगर पालिकेची सभा होती. त्यासभेत तुकाराम सदाशिव महाजन, वामन अच्युत देशचौगुले, विनायक श्रीनिवास मामलेदार व मयाचंद विठ्ठलचंद गुजर हे सभासद उपस्थित होते. त्यावेळी नगरपालिकेतर्फे वाचनालय चालविण्याचा विषय चर्चेला आला. नगर वाचनालय लोकांसाठी उपयोगी असल्याने नगर वाचनालय सुरू करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. नगरपालिकेने वाचनालयासाठी 108 रुपयांचे अनुदान मंजूर केले आणि “नेटिव्ह जनरल लायब्ररी” या नावाने नगर वाचनालयाची मुहूर्तमेढ रोवली.